पो. डा. वार्ताहर : महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच उलथा पालथ होत असताना आता पर्यंत ठिक होते, पण आता आपला राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष रडारवर आला आहे. अशा अत्यंत नाजूक वेळी प्रत्येक नेत्याला आणि कार्यकर्त्याला निर्णायक भूमिका घ्यावी लागेल.
सत्तेतील भाजपा पक्षाला फाट्यावर मारुन मुदत पूर्व आमदारकीचा राजीनामा देवून बाहेर पडलो होतो. आपल्याच सहकार्यांविरुध्द कट कारस्थाने करणे , चुकून सुध्दा खरे न बोलणे, दिलेला शब्द न पाळणे, भ्रष्टाचार तर पाचविला पूजलेला ! मी नाही त्यातली , कडी लावा आतली असे प्रतंतर अनेकवेळा पाहिले. प्रत्यक्षात मात्र उक्ती आणि कृती यात जमिन आकाशाचे अंतर असतांनाही तेवढ्याच निर्लज्जपणे केल्या जाणार्या वर्तणुकीचा अक्षरशः उबग आला होता. त्यातल्या त्यात उच्च वर्णियांची मक्तेदारी , ओबीसी समाजाबद्दल अत्यंत खालच्या पातळीवरुन व्देषपूर्ण वर्तणूक , धनगर समाजाची केलेली घोर फसवणूक तर मन उद्विग्न करणारी होती. अशा अगणीत कारणांमुळेच पक्षातील हीन राजकारणातून पक्षातून बाहेर पडलो. खरे तर संघ परिवाराशी तब्बल पन्नास वर्षाचे नाते तोडून बाहेर पडलो.
मी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षात जाईन करेल असे कुणी स्वप्नातहि मान्य केले नसते.पण घडले तसेच! राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा मा. शरद पवार साहेबांना सोडून अनेक नेते भाजपावासी झाले. अनेकांना शरद पवारांनी ओळख दिली. पद दिली. प्रतिष्ठा दिली. मान सन्मान दिला. असे कृतघ्न नेते पवार साहेबांना सोडून चालले होते. वयाच्या अंशीव्या वर्षी त्यांना वेदना देण्याचे पापकृत्य पहात होतो. माझ मन मला स्वस्थ बसू देईना ! मी निर्णय केला की ज्या निष्ठुरांना जायचे ते गेले तेल मागत. अशा कठीण काळात आपण पवार साहेबां बरोबर जावू! मला ओळखणार्यांना हे पटणारेच नव्हते. मानणे तर शक्यच नव्हते.पण मी निर्णय घेतला आता माघार नाही.
माझ्या पहिल्या भेटीतच मीः पवार साहेबांना शब्द दिला. आता माझा हा शेवटचा मुक्काम ! मरे पर्यंत मी आपली साथ सोडणार नाही. मी शब्दाचा पक्का माणूस आहे. या सर्व पार्श्वभूमिवर मी माननीय शरद पवार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष व माननिय जयवंतराव पाटील प्रदेशाध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षासोबतच रहाणार आहे.जे बरोबर येतील त्यांच्यासह ! अन्य ज्याला कुठे झक मारायची असेल त्यांना त्यांचे मार्ग मोकळे आहेत. बरोबर येतील त्यांचे स्वागत ! येणार नाहीत त्यांना शुभेच्छा !!