परभणी, दि.08 पो.डा. प्रतिनिधी : जिल्ह्यात अंमली पदार्थ आणि अवैध मद्यविक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठी संबंधित विभागाने अंमली पदार्थांची आणि अवैध मद्यविक्री करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. यांनी दिल्या.
पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीच्या बैठकीत पोलिस अधीक्षक रागसुधा आर. बोलत होत्या. बैठकीस राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक भगवान मंडलवार, अन्न व औषध प्रशासन निरीक्षक मनेाज पैठणे, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिनिधी डॉ. अमरदीप घुगे, नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर, कृषि विभागाचे एन. के. चव्हाण, टपाल विभागाचे मोहमद इर्शाद शेख यांच्यासह समिती सदस्य यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यातील अंमली पदार्थ विरोधी कारवाईबाबत कामकाजाचा आढावा घेताना पोलिस अधीक्षक आर. रागसुधा म्हणाल्या की, शहर व जिल्ह्यातील काही पान टपऱ्यावर प्रतिबंधीत अंमली पदार्थ आणि गुटखा, अवैध मद्यविक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे याची अन्न व औषध प्रशासन विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने तात्काळ दखल घेवून संबंधितावर योग्य ती कार्यवाही करावी. त्यासाठी पोलीस विभागाच्या सहकार्याची आवश्यकता असल्यास मदत केली जाईल. अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यावर आणि कुरीअर पोस्टाच्या माध्यमातून अंमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्यावर संबंधित यंत्रणेने पोलिसांच्या सहकार्याने कारवाई करण्याचे निर्देश श्रीमती रागसुधा आर. यांनी बैठकीत दिले.
युवा पिढी हे आपल्या देशाचे भविष्य असून, त्यांना जीवघेण्या अंमली पदार्थाच्या व्यसनांपासून दूर ठेवणे आपली जबाबदारी आहे. त्याकरिता अंमली पदार्थाच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये या विषयावर जनजागृती कार्यक्रम, चर्चासत्र आयोजित करावेत, असे ही त्या यावेळी म्हणाल्या.