पोलीस डायरी वार्ताहर : पुणे पोलिसांनी अटक केलेल्या त्या दोन दहशतवाद्यांनी कोल्हापूरनजीक महामार्गावर एका गावात दोन दिवस वास्तव्य केल्याचे व त्याच दरम्यान चांदोली धरण परिसराची रेकी केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने चांदोली धरण परिसरात खळबळ उडाली आहे. व्हॉट्स अॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियामध्ये रविवारी दिवसभर याच वृत्ताच्या पोस्ट परिसरामध्ये फिरत होत्या. दहशतवाद्यांनी या परिसराची रेकी नेमकी का केली असेल? त्या पाठीमागे दहशतवाद्यांचा काय उद्देश असावा? याबाबतीत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. हे धरण महाराष्ट्रातील दोन नंबरचे मातीचे धरण आहे.
पाणी साठवण क्षमता 34.40 टीएमसी इतकी आहे. या धरणामुळेच हा परिसर सुजलाम सुफलाम झाला आहे. या धरणावर दहशतवाद्यांची वाकडी नजर पडली आहे. धरण क्षेत्रात काही घातपात घडवण्याचे जर दहशतवाद्यांचे मनसुबे असतील तर ते वेळीच उधळून लावण्यासाठी या टोळीत सामील असलेल्या सगळ्या दहशतवाद्यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करावी व कडक कारवाई करण्यात यावी, अशा भावना नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहेत.