पो. डा. वार्ताहर, चंद्रपूर :- जिल्ह्यातील अवैध दारु विक्री व हातभट्टीदारु निर्मीती, विक्री, वाहतुक विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत माहे मे महिन्यात विशेष मोहीम आयोजित करण्यात आली होती. भद्रावती, वरोरा, चिमुर, चंद्रपुर, सिंदेवाही, राजुरा, मुल, बल्लारपुर, ब्रम्हपुरी, नागभीड या तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूर यांनी धाडी टाकुन महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत नियम भंगासाठी एकुण 91 गुन्हे नोंदविले. या कार्यवाहीत एकुण 68 आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदवुन संपुर्ण कार्यवाहीमध्ये चार
वाहनांसह एकुण रुपये 5 लाख 70 हजार 60 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरोरा भागात दोन देशी दारु किरकोळ विक्री दुकानांवर नियमभंग प्रकरणी गुन्हे नोंदविण्यात आले आणि मुंबई दारुबंदी कायद्याचे कलम ९३ अंतर्गत एकुण १३ इसमांवर प्रतीबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव दाखल केले. सदर कार्यवाही अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क श्री. संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाद्वारे पार पाडली.
आनंद वाईन शॉपची अनुज्ञप्ती 15 दिवसांकरिता निलंबित : जिल्हाधिकारी
अनुज्ञप्ती नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी चंद्रपूरच्या सराई वार्ड, जटपुरा गेटजवळील आनंद वाईन शॉपची अनुज्ञप्ती 15 दिवसांकरिता निलंबित केली असल्याचे आदेश काल (दि.31 मे) निर्गमित केले.