महापौर मॅडम, साप निघून गेल्यावर लाठी आदळताय !!! खरे कि दिखावा?? या संभ्रमात जनता
राजन चौक, जिल्हा प्रतिनिधी, पोलीस डायरी, धुळे,
धुळे महानगरपालिकेच्या सर्वत्र गाजत असलेल्या भ्रष्ट्र कारभार आणि कार्यवाहीतील निष्क्रियतेमुळे शहरातील जनता प्रचंड वैतागलेली आहे. अलिकडेच महापौर पदावर सौ प्रतिभा चौधरी बसल्यात. या भ्रष्टाचारात बरबटलेल्या सत्ताधाऱ्यांच्यावरील कार्यवाही बद्दल विचार करता सर्वत्र उदासीनता आहे. महानगरपालिकेत दिलेल्या सत्तेचा फायदा उचलत अनेकांनी शासकीय निधीचा गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने हाथ धुवून घेतलेत, त्यामुळे महापौर मॅडम ज्या फाटलेल्या आकाशाला ठिगळ लावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत ना ते करतानाच महापालिकेचा लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपत आलेला आहे. अशातच त्यांना जर का हे सर्व सावरून पुन्हा जनतेसमोर जायचे असेल तर त्यासाठी त्यांनी आता दोषींवर कार्यवाहीचा बडगा उचलणे गरजेचे आहे, अन्यथा कोणत्या तोंडाने जनतेकडे मत मागायला फिरणार आहेत ?? शासकीय आणि जनतेसाठी असलेल्या निधीची बनावट कागदपत्रे बनवूंन महानगरपालिकेला चुना चोपडणाऱ्यांवर कार्यवाही होऊन, संबंधित निधी पुन्हा वसुलीची काय कार्यवाही करणार आहेत हे आधी जनतेसमोर संपूर्ण सत्ताधाऱ्यानि येऊन स्पष्ट करणे आवश्यक आहे, नाही तर काँग्रेस चा सुपडा साफ केला तसा भाजपचा सुपडा साफ होण्याची शक्यता अजिबात नाकारता येणार नाही.
“ये जो पब्लिक है ये सब जानती है, पब्लिक है !!!” त्यामुळे आता जनतेला गृहीत धरणे बंद करा, असा विचार नक्कीच धुळेकरांच्या मनात आहे. शहरामध्ये मनपाच्या कारभाराबाबत प्रचंड गोधळ उडालेला आहे. या भ्रष्टाचाराने मोठी जखम झाली आहे, त्यावर जालीम उपाय करायची गरज आहे. दोषींवरील कार्यवाही प्रस्तावित करण्यासाठी तेवढा वेळ महापौरांजवळ नक्कीच आहे. त्यामुळे त्यांनी दोषींवरील कारवाई टाळल्यास उत्तर जनता जनार्दनाला देणे आहे हे विसरून कोणालाही चालनार नाही. साडेचार वर्षांपूर्वी या महापालिकेवर मोठी स्वप्ने दाखवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या शब्दाला मान देऊन धुळेकरांनी भाजपाच्या उमेदवारांना भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे लोकांच्या अपेक्षाही खूप वाढलेल्या होत्या. पण दैनंदिन नागरी सुविधांची कामे समाधानकारक झाली नाहीत. मनपाच्या भ्रष्ट सत्तांतराने धुळेकरांचे हाल – हाल करून सोडले. या पार्श्वभुमीवर आता शेवटी – शेवटी नागरिकांच्या समस्यांवर फुंकर घालण्याचा दिखावा करून काय उपयोग होणार आहे ? शहरातील असंतोषाचा हा दबाव पाहता महापौरांनी या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी नगरसेवकांची नुकतीच एक मीटिंग घेतली, त्यात नगरसेवकांनी नाराजीचा सूर लावला. आपल्याला जनतेने दिलेल्या प्रतिसादाचा मान ठेवण्यात असमर्थ ठरलेले नगरसेवक आपल्या असमर्थतेबद्दल पश्चाताप करण्या ऐवजी नगर सेवक झाल्या बद्दल पश्चाताप व्यक्त करत होते. या बैठकीत आयुक्त आणि नगरसेवकांमध्ये देखील खडाजंगी झाली. नव्याने भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष झालेले गजेंद्र अंपळकर सुद्धा या बैठकीत उपस्थित होते. त्यांनी खराब काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकानयेत यावे अशी सुचना केली. खराब काम करणाऱ्या ठेकेदारांचे खराब कामाचे मोजमाप करून – मंजुर करून बिले काढणारे कोण आहेत ? निविदेत नमुद कामाच्या निम्मेही काम न करणार्या ठेकेदारांना अनुकुल शेरे मारणारे मनपाचेच अभियंते व अधिकारी ना! मनपाच्या कामांबाबत गुणवत्तेबाबत – खरेदी बाबत नागरीकांमधून आलेल्या तक्रारींवर कारवाई न करता त्या तक्रारीच गायब करणारे मनपाचेच अधिकारी असतात ना ! तुम्ही एक ठेकेदार ब्लॅक लिस्ट केला तर दुसरा येईल. त्यालाही टक्केवारी देणे भागच आहे. त्याशिवाय कुणी कामच करू शकत नाही. भ्रष्ट्राचाराचे मुळ हे यंत्रणेत वाटल्या जाणाऱ्या टक्केवारीत आहे. अंपळकर म्हणाले, की बांधकाम विभागात पैसे घेतल्याशिवाय फाईल पुढे जात नाही. बांधकामाच्या फाईली मंजुरीची काल मर्यादा निश्चित करून भ्रष्ट्राचारास वाव देणारा मानवी संपर्क नको म्हणून सर्व काम ऑन लाईन करण्याच्या सुचना आहेत. तरी देखील फाईल टाकणाऱ्यांना समक्ष बोलावलेच जाते. कां बोलावले जाते, त्याच्या मुळापर्यंत जाण्याची गरज आहे. कुठल्या टप्प्यापर्यंतच्या फाईल मध्ये कुणाचा काय वाटा असेल ? यावरून अनेकदा असंतोषाचे वातावरण होताना सर्वानाच पाहायला मिळाले आहे. अंपळकर हे नुकतेच भाजप महानगर जिल्हाध्यक्ष झालेले आहेत. त्यांना येणाऱ्या मनपा व आमदारकीच्या निवडणुकीला पक्ष नेतृत्व म्हणून सामोरे जावे लागणार आहे. त्यावेळेस त्यांना पक्षाला रिझल्ट दाखवावे लागणार आहेत. परंतु गेल्या साडेचार वर्षात शहराच्या सोयी आणि सेवांचे धूळधाण करून ठेवण्यात आलेली आहे. ते पाहता देण्यात आलेले काम वाटते तितके सोपे नसणार हे मात्र नक्की.
त्यामुळे यावेळची निवडणूक भारतीय जनता पार्टी ला मागील वेळासारखी सोपी आणि सहज राहणार नाही.
साडे चार वर्षांपूर्वी मनपावर भाजपची सत्ता आली, त्यावेळेसच आताच्या महापौरांसारखा अधिकार्यांशी संगनमत करण्याऐवजी त्यांना धारेवर धरणारा महापौर बसवणे आवश्यक होते.
निवडणूक झाल्या झाल्या धुळे मनपा भ्रष्टाचाराचे, खाण्याचे मार्ग बंद करणारा, अधिकारी, कर्मचारी याना धारेवर धरून जनहिताची कामे करणारा महापौर भाजपने दिला असता, तर अत्याधिक संख्येने आणि मोठ्या मताधिक्याने जनतेने जनमताचा कौल दारोदारी न फिरताच मिळाला असता. त्यामुळे कदाचित आता धुळेकरांचे प्रश्न आणि समस्या सोडवायला कोणा बाहेरील धडाकेबाज नेत्याला आणावे लागेल, असा विचार जनतेच्या मनात फिरत आहे. तसे झाल्यास कदाचित तेव्हा सर्व भ्रष्ट नगरसेवकांना खऱ्या अर्थाने पश्चाताप करण्याची वेळ येईल हे नाकारता येणार नाही.