नागपूर जिल्ह्यात सर्व मतदार संघात 1 जून ते 16 ऑगस्ट 2023 मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण या कार्यक्रम जाहीर झाला आहे. अठरा वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांनी मतदान नोंदणी करून घ्यावी. तसेच मतदार यादीबरोबर आधारकार्ड जोडण्यात यावे, असे आवाहन मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी यांनी केले आहे.
निवडणूक आयोगाने घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीने मतदान नोंदणी चालू केली आहे. त्यासाठी NVSP.IN हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. VOTER HELPLINE हे अॅप्लिकेशनही उपलब्ध आहे. तसेच प्रत्येक गावांमध्ये बिएलओकडे देखील ऑफलाईन पद्धतीने मतदार नोंदणी करता येते.
या कालावधीत मतदान ओळखपत्र दुरुस्ती, नवमतदार नोंदणी, मतदान ओळखपत्र आधारकार्डशी जोडणे, मतदार यादीतील नाव कमी करणे अशी सर्व कामे करता येतील. जास्तीत जास्त मतदार नोंदणी व्हावी, यासाठी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दक्षिण नागपूर, पूर्व नागपूर, मध्य नागपूर, उत्तर नागपूर, पश्चिम नागपूर, पश्चिम-दक्षिण नागपूर विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी यांनी केले आहे.